दापोली : महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) 2025 चा तिसरा हंगाम मे ते जून 2025 दरम्यान पुण्यातील एमसीए गहुंजे आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे. या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गुणवान क्रिकेटपटूंना राष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी मिळणार असून, भविष्यात भारताला दर्जेदार खेळाडू मिळतील, असा विश्वास महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी व्यक्त केला.

दापोली येथील रॉयल गोल्ड फील्ड संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत एमपीएल आणि विमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) 2025 च्या आयोजनाची घोषणा करण्यात आली.

यावेळी मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ, रॉयल गोल्ड फील्डचे अनिल छाजेड, एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे, अपेक्स कौन्सिल सदस्य शुभेंद्र भांडारकर, राजू काणे, सुनील मुथा, विनायक द्रविड, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, सीईओ अजिंक्य जोशी, रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपीन बंदरकर, सर्व संघमालक, पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, “एमपीएल ही केवळ स्पर्धा नसून एक परिवार आहे. संघमालक, खेळाडू, पदाधिकारी, तांत्रिक टीम आणि सपोर्ट स्टाफ यांच्या परिश्रमांमुळे ही स्पर्धा यशस्वी ठरली आहे. राज्यातील तळागाळातील क्रिकेटचा प्रसार व्हावा आणि होतकरू खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. येत्या काळात एमपीएल देशातील सर्वात लोकप्रिय आणि व्यावसायिक क्रिकेट स्पर्धांपैकी एक असेल.”

मानद सचिव ॲड. कमलेश पिसाळ यांनी सांगितले, “दरवर्षी नव्या खेळाडू आणि संघांच्या सहभागामुळे एमपीएलचा आलेख उंचावत आहे. विशेषतः महिला क्रिकेटमधील उत्साहवर्धक प्रतिसाद कौतुकास्पद आहे. सातारा वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, रायगड रॉयल्स, पुष्प सोलापूर, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स, ईगल नाशिक टायटन्स आणि 45 पुणेरी बाप्पा यांसारख्या संघांमुळे स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळेल. या स्पर्धेतून अनेक नवोदित खेळाडू भविष्यात राज्य आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील.”

लिलावात कोल्हापूर टस्कर्स आणि पुष्प सोलापूरची मोठी बोली

17 एप्रिल 2025 रोजी पुण्यात पार पडलेल्या खेळाडू लिलावात 409 पुरुष आणि 249 महिला खेळाडूंनी नोंदणी केली होती. पुरुष विभागात PBG कोल्हापूर टस्कर्सने वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानीसाठी ₹5,20,000 ची सर्वाधिक बोली लावली, तर महिला विभागात पुष्प सोलापूरने तेजल हसबनीससाठी ₹4,40,000 ची बोली लावून तिला संघात सामावून घेतले.

स्पर्धेचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर

एमपीएल 2025 मध्ये 6 संघ आणि डब्लूएमपीएल 2025 मध्ये 4 संघ सहभागी होणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण जिओ हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्सवर होणार असून, ही स्पर्धा देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.

एमपीएल 2025 सहभागी संघ: 45 पुणेरी बाप्पा, PBG कोल्हापूर टस्कर्स, रत्नागिरी जेट्स, ईगल नाशिक टायटन्स, सातारा वॉरियर्स, रायगड रॉयल्स
डब्लूएमपीएल 2025 सहभागी संघ: पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, पुष्प सोलापूर, रायगड रॉयल्स