चिपळूण पूरग्रस्त भागात अभाविप करणार महाआरोग्य अभियान

चिपळुण:- कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. कोविड १९ च्या दुसऱ्या लाटेतुन सावरतो ना सावरतोय ते कोकणावर आलेले महापुराचे संकट आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कंबर कसून उतरली आहे. चिपळूण मधील पूरग्रस्त भागात भोजन वाटप, पाणी वाटप, रेशन कीट वाटप इत्यादी सेवा अहोरात्र पुरवत आहे. तसेच वैद्यकीय सेवा व प्राथमिक उपचार पुरविण्यात येत आहेत. विशेषतः अनाथाश्रम, गर्भवती महिला अश्या लोकांना घरपोच वैद्यकीय सेवा पुरविण्याचे सेवाकार्य अभाविप करत आहे. पूर परिस्थितीमुळे घर, दुकाने यांच्या साफसफाई साठी कार्यकर्ते सेवा पुरवत आहेत. येणाऱ्या काळात विद्यार्थी परिषद जिज्ञासा व मेडीव्हीजन यांच्या सहकार्याने महा आरोग्य अभियान हाती घेत आहे. या अभियानात ०१ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत चिपळूण मधील पूरग्रस्त भागातील २०,००० पेक्षा अधिक नागरीकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाणार आहे. हे अभियान पूरग्रस्त भागातील विविध ५० स्थानांवर राबविण्यात येणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे चालू शैक्षणिक वर्षाचे पालकत्व विद्यार्थी परिषद घेणार आहे. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक कीटचे वाटप सुध्दा अभाविप करणार आहे. विद्यार्थी परिषद यांच्यावतीने आव्हान करण्यात आले आहे की आपणही या सेवाकार्यात सढळ हातांनी मदत करावी. या आगोदरही निसर्ग चक्रीवादळ, ताउत्के वादळ अश्या अनेक मोठ्या संकटांवर मात करून कोकण नव्याने उभे राहिले आहे आणि आजही या पूर परीस्थितीतून कोकण नक्कीच नव्याने उभे राहिल. या पूर परीस्थितीत नागरीकांना सेवा देण्यात विद्यार्थी परिषद नेहमीच कटीबद्ध राहिल असे विचार उत्तर रत्नागिरी जिल्हा संयोजक मृणाली गुरव यांनी यावेळी व्यक्त केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*