रत्नागिरी – शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या साळवी स्टॉप, नाचणे परिसरामध्ये आता भरपूर वर्दळ असते. महामार्ग आणि शहरातील विविध मार्गांचा तो चौक असून या परिसरात सध्या वाहनांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे लहान मुले, पादचाऱ्यांना चालत जाणे कठीण बनते. त्यामुळे रस्ता ओलांडणेसुद्धा कठीण होते. याची दखल घेत भाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी या भागात वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी आज केली. यासंदर्भात भाजपाच्या शिष्टमंडळाने वाहतूक पोलिस निरीक्षक शिरीष सासणे यांना निवेदन दिले. त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन श्री. सासणे यांनी दिले आहे.
साळवी स्टॉप नाका हा शहराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. येथे किमान तीन गजबजलेले क्रॉसिंग स्पॉट आहेत. यात हवामान खाते ते साळवीस्टॉप, साळवी स्टॉप ते मिऱ्या, मिऱ्या ते हवामान खाते यांचा समावेश आहे. दोन्हीही बाजूला एसटीचा बस थांबा असल्याने क्रॉसिंग स्पॉटवर रस्ता ओलांडणे धोक्याचे बनले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुले यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. ही बाब लक्षात घेऊन भाजयुमो शहर सरचिटणीस प्रवीण देसाई यांनी आज वाहतूक पोलिसांची भेट घेतली.
कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी ९.३० ते ११.३० वाजता आणि सायंकाळी ५.३० ते ७.३० वा. या वेळेत येथे वाहनांची खूप वर्दळ असते. वाहनधारकांना देखील रस्ता पार करता येत नाही. बराच काळ वाहतूक कोंडी पाहायला मिळते. शहराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असल्याने किमान वरील वर्दळीच्या वेळेत येथे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंत्रण करावे, अशी मागणी प्रवीण देसाई यांनी या वेळी केली.
भाजप जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक उमेश कुळकर्णी, गौरांग आगाशे, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, शहर सरचिटणीस संदीप सुर्वे, नितीन गांगण यांनी निवेदन दिले