मुंबई – ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावे ‘सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ हे प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्र सुरू करण्याची घोषणा मुंबई विद्यापीठाने केली. व्यवस्थापन परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रासोबतच विद्यापीठात लता मंगेशकर यांच्या नावे सुवर्णपदक बहाल केले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. या केंद्रांच्या माध्यमातून पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पीएचडीसाठी संशोधन केले जाणार आहे.
मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात स्थापन होणाऱ्या एक्सलेंस सेंटरमध्ये अद्ययावत स्टुडिओ, सांगितीक उपकरणे, तांत्रिक सोयी-सुविधा असतील. यानिमित्ताने परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय सुगम संगीत क्षेत्रातील संशोधनाची संधी उपलब्ध होणार आहे.
लता मंगेशकर यांच्या कार्यावर शास्त्रोक्त अध्ययन करण्यासाठी संगीत विभागात त्यांच्या नावे अध्यासन स्थापन केले जाणार आहे. त्याच्या माध्यमातून लता मंगेशकर यांच्या संगीत विश्वातील कार्यावर सखोल अध्ययन आणि संशोधन केले जाणार आहे, असे कुलगुरु सुहास पेडणेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.