खेड येथे अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

खेड- तालुक्यातील धामणंद परिसरात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या वादळी पावसाचा सर्वाधिक फटका हापूसला बसला. सुमारे दीड तास निसर्गाचे तांडव सुरु होते. आज दुपारी देखील खेड तालुक्यातील काही भागात पावसाच्या जोरदार सारी कोसळल्या. गेले दोन दिवस वातावरण ढगाळ होते. मात्र वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसेल असे वाटत नव्हते. रविवारी दुपारपासूनच धामणंद परिसरात वातावरण पावसाळी झाले होते. मध्येच ढगांचा गडगडाट सुरु होता. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसायला सुरवात झाली. सोबत सोसाट्याचा वर देखील होता. या वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. जनावरांची वैरण भिजली. हापूस ला तर जोरदार फटका बसला. एकतर या वर्षी हापूस चे पीक अतिशय कमी आहे. जे आहे ते वाचविण्यासाठी शेतकरी जीवाचे रान करत आहेत मात्र कालच्या वादळी पावसाने या परिसरातील हापूस बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. वाऱ्यामुळे पाडाला आलेला आंबा गळून गेला आहे.

वादळामुळे काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून जाणे, गोठ्याचे छप्पर उडणे, घरावरील कौले उडून जाणे अशा घटना घडल्या आहेत. निसर्गाच्या प्रकोपाने या परिसरातील शेतकरी पुरता हादरून गेला आहे. आधीच कोरोना महामारीमुळे शेतकरी गलितगात्र झाला आहे त्यात आता निसर्ग ही मागे लागला असल्याने शेतकऱ्यांनी करायचे तरी काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत तहसील कार्यालयात संपर्क साधला असता पंचनामे सुरु झाले असून लवकरच झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाला सादर केला जाईल असे सांगण्यात आले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*