कुणबी सेवा संघ, दापोलीतर्फे पूज्य सामंत गुरूजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृति मेळावा उत्साहात संपन्न

सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृति पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण

दापोली, दि. ११ जानेवारी, २०२६

कुणबी सेवा संघ, दापोली यांच्यावतीने पूज्य सामंत गुरुजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी या गुरुद्धयांच्या पवित्र स्मृतिंना अभिवादन करणारा स्मृति मेळावा व सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृति पुरस्कार वितरण समारंभरविवार, दि. ११ जानेवारी, २०२६ रोजी दापोली येथे सेवाव्रती शिंदे गुरूजी सभागृहात अत्यंत भक्तिभावपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि भारत सरकारचे माजी अवजड उद्योग मंत्री मा. अनंतरावजी गीते, प्रमुख पाहुणे संतसाहित्य अभ्यासक, वारकरी किर्तनकार आणि प्रवचनकार मा.ह.भ.प. ज्ञानेश्वर बंडगर, कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे, माजी अध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र गीते, उपाध्यक्ष डॉ प्रमोद सावंत, सदस्य डॉ. अशोककुमार निर्वाण, सचिव श्री हरिश्चंद्र कोकमकर व खजिनदार श्री. प्रदिप इप्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात गुरुद्वयांच्या समाधीस बंदन, दीपपूजन व गुरुजीच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर “खरा तो एकची धर्म” या कन्या छात्रालयाच्या विद्यार्थिनीनी गायलेल्या आशयपूर्ण प्रार्थनेने वातावरण अध्यात्ममय झाले

या प्रसंगी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा प्रभाकर शिंदे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अनंतरावजी गीते आणि प्रमुख पाहुणे मा. ह.भ.प. ज्ञानेश्वर संजय बंडगर यांचे स्वागत आणि सत्कार केला. त्यांच्या प्रास्ताविकातून त्यांनी पूज्य सामंत गुरूजी आणि सेवाव्रती शिंदे गुरुजी यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सेवाभावी कार्याचा आढावा घेतला. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले विचार व मूल्ये आजही मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याच प्रमाणे त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चाललेल्या कुणबी सेवा संघाच्या वाटचालीचा आढावाही त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

गुरुद्वयांचे पुण्यस्मरण करताना डॉ. प्रमोद सावंत आणि डॉ. राजन खांडेकर यांनी पूज्य सामंत गुरुजी आणि सेवाव्रती शिंदे गुरुजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्यांनी गुरुजींनी समाजमनात रुजवलेल्या सेवा, त्याग व नैतिक मूल्यांचा ऊहापोह केला.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सेवाव्रती शिंदे गुरूजी स्मृति पुरस्कार वितरण. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिक्षण आणि शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी शिक्षक व प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये ‘उत्कृष्ट प्राथमिक शिक्षक (ग्रामीण)’ हा पुरस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, कर्दे, ता. दापोली येथील प्राथमिक शिक्षक श्री. स्वप्नील परकाळे तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंबवली, ता. खेड येथील प्रार्थमक शिक्षिका सौ. रसिका रेवाळे यांना प्रदान करण्यात आला. ‘उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (ग्रामीण)’ हा पुरस्कार एन. के. वराडकर हायस्कूल, मुरूड, ता. दापोली येथील शिक्षक श्री. राजेश नरवणकर यांना देण्यात आला तर मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी येथील शिक्षक श्री. इम्तियाज सिद्दिकी यांना ‘उत्कृष्ट माध्यमिक शिक्षक (शहरी)’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी’ या पुरस्काराने दोन शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. यामध्ये सांगवे, ता. संगमेश्वर येथील श्री. विलास शेलार तसेच आगवे, ता. लांजा येथील महिला शेतकरी श्रीमती मिताली जोशी यांचा समावेश आहे. या पुरस्कारांचे वितरण माजी केंद्रीय मंत्री मा. श्री. अनंत गीते आणि प्रमुख पाहुणे मा.ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर बंडगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम रु.५०००/- असे होते. या पुरस्कारार्थीच्या मानपत्राचे वाचन श्री. रमाकांत शिगवण, सौ. उज्वला इप्ते आणि श्री. दिनेश राणे यांनी केले होते.

पुरस्कारार्थीच्या वतीने श्री. स्वप्निल परकाळे आणि श्री. इम्तियाज सिद्दिकी यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी कुणबी सेवा संघाचे आभार मानत समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याची ही संकल्पना अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद केले. अशा गौरवामुळे आपल्या कार्याला नवी ऊर्जा व अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले. या पुरस्काराच्या निमित्ताने पूज्य सामंत गुरूजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख झाली असून पुढील वाटचाल करताना गुरूजीजी दाखविलेल्या सेवाभावी व मूल्याधिष्ठित मार्गानेच कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा.ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर बंडगर यांनी “सत्यशोधक गाडगे बाबा जीवन आणि कार्य” या विषयावर विचारपूर्ण मार्गदर्शन केले. संत गाडगेबाबांनी बारा वर्षे समाजभ्रमंती करताना समाजातील वास्तव जवळून पाहिले आणि निरक्षरता, सावकारचा विळखा, रूढी परंपरांवर होणारा अवाजवी खर्च तसेच व्यसनाधिनता या सामाजिक अनिष्ट बाबी त्यांच्या लक्षात आल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांवर उपाय म्हणून गाडगो बाबांनी शिक्षणाचे महत्व, सामाजिक समता, खच्छता व मानवतेचा विचार आपल्या प्रबोधनातून मांडला. धर्माला कर्मकांडातून बाहेर काढून तो सेवाभावाशी जोडण्याचा विचार त्यांनी समाजात रुजवला आजच्या काळात गाडगेबाबांचे विचार अधिकच समर्पक असून युवकांनी ते आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात मा. अनंतराव गीते यांनी पूज्य सामंत गुरुजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी यांच्या कार्यक्रमाचा संदर्भ देत समाज घडणीतील गुरू परंपरेचे महत्व अधोरेखित केले. इतिहासाची पाने चाळत असताना त्यातून भविष्यचा वेध घेणारी दृष्टी विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्याची पिढी सक्षम आणि संस्कारक्षम घडविण्याच्या दृष्टिने कुणबी सेवा संघाने सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. शिक्षण, सेवा व सामाजिक बांधिलकी यांची सांगड घालून समाज सक्षम करता येतो, असे प्रतिपादन त्यांनी केले. गुरुजींच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच खरी स्मृती जपण्याची पध्दत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकमाचे सूत्रसंचालन श्री प्रभाकर तेरेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. सुनिल गुरव यांनी केले. कार्यक्रमाची सांगता सौ. संजिवनी लाडे यांनी गायलेल्या पसायदानाने झाली.

या कार्यक्रमाला समाजाच्या विविध घटकातील प्रतिष्ठीत मंडळी, नागरिक, पालक, शेतकरी, माजी विद्यार्थी, दोन्ही छात्रालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा स्मृति मेळावा म्हणजे केवळ गुरूवर्याच्या आठवणींचा कार्यक्रम नसून, त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा एक प्रभावी संकल्प असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. प्रभाकर शिंदे व उपाध्यक्ष, डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खजिनदार श्री प्रदीप इप्ते, सचिव श्री हरिश्चंद्र कोकमकर, श्रीमती गितांजली जोशी, सौ. सुषमा शिंदे, सौ. उज्वला इप्ते, सौ. गार्गी सावंत, श्री. विजय शिगवण, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेंद्र शिंदे, नवभारत छात्रालयाचे अधिक्षक श्री. सुनिल ठाकूर, पू. सामंत गुरुजी कन्या छात्रालयाच्या अधिक्षिका सौ. वर्षा पाते, कर्मचारी सौ. रेणुका शिंदे, सौ. किर्ती घाग, श्री. रविंद्र गोरीवले, सौ. कोमल जावकर, श्री. सुजित गोलांबडे, श्री. समिर शिबे, श्री. कमलाकर मुळे, श्री. प्रदिप मुलुख, श्री. प्रेम पागडे, सौ. समिधा कोकमकर, सौ. स्नेहल पवार, तसेच सौ मानसी मुलुख, सौ. श्रावणी गावडे, सौ. रिया पागडे, श्रीमती. सुवर्णा अबगुल, कु. दक्षता मिसाळ, सौ. धनश्री मुलुख, सौ. पूर्वी टेटविलकर, कु, संजना सोविलकर, सौ. भाग्यश्री जगदाळे, सौ. संजना गार्डी, सौ. दिक्षा तेगडे, सौ. अक्षरा दुबळे, कु. मिनल शिगवण, सौ. रुचि तानावडे तसेच दोन वसतिगृहांचे विद्यार्थी विद्यार्थीनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*