महाविकास आघाडीची विकास पताका घेऊन धावल्या कोयना, महाराष्ट्र एक्‍सप्रेस

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे आणि राबविलेल्या योजनांची माहिती जनतेपर्यंत लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून पोहोचवण्यात येत आहेत. यात सातारा जिल्ह्यातून कोयना एक्‍सप्रेस (कोल्हापूर ते मुंबई) आणि महाराष्ट्र एक्‍सप्रेस (कोल्हापूर ते गोंदिया) या रेल्वेगाड्यांची निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाची “विकास पताका’ घेऊन योजनांच्या आकर्षक पद्धतीने मांडलेल्या माहितीसह या दोन्ही गाड्या धावत आहेत.

राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजना, कार्यक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. रेल्वेवरून प्रसारित करण्यात येत असलेली माहिती प्रवासी व स्थानिक नागरिक लक्षपूर्वक ऐकत आहेत. “दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’, “आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ अंतर्गत राज्य शासनाने राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. यात कौशल्यविकास रोजगार मेळावा, वेबपोर्टलद्वारे दीड लाख बेरोजगारांना रोजगार, कुटुंबातील महिलांच्या नावे घरे असल्यास महिला सक्षमीकरणांतर्गत मुद्रांक शुल्कात एक टक्‍का सवलत,

करोना काळात पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखांची मुदतठेव योजना, चिंतामुक्त शेतकरी, मोफत सातबारा आता दारी येणार, ई-पीक पाहणी नोंदणीही करता येणार, जिथे सारथी, तिथे प्रगती, क्षमता आणि कौशल्यवृद्धीसाठी शिक्षण-प्रशिक्षण, पर्यावरणपूरक प्रवासाला राज्य शासनाचे प्राधान्य, विद्युत बससेवेत वाढ, राज्यातील प्रदूषणाला आळा आदी माहिती “महाराष्ट्र एक्‍सप्रेस’द्वारे जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

राज्य शासनाची विकासकामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या एक्‍सप्रेस रेल्वे सातारा जिल्ह्यातील रेल्वेस्थानकांवर आल्यानंतर बोगींवर लावण्यात आलेल्या आकर्षक जाहिराती प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*