कोकण रेल्वेचा वेग 10 जूनपासून मंदावणार

रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करण्यात येणार असून गाड्यांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. पावसाळ्यासाठी संपूर्ण मार्गावर चोविस तास गस्त घालण्यासाठी 681 कर्मचारी नियुक्त केले आहेत. भौगोलिक सुरक्षेवर भर दिल्यामुळे बोल्डर पडण्यासह माती घसरण्याच्या प्रकारात लक्षणीय घट झाली आहे.
पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज झाली आहे. कोरोनाचे नियम पाळून कोलाड ते ठोकूर या मार्गावरील सर्व सुरक्षेची कामे पूर्ण झाली आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी साफसफाई आणि कटिंग्जची यावर विशेष लक्ष देण्यात आले होते. गेल्या काही वर्षांत रेल्वेमार्गावर पावसाळ्यात कोणत्याही दुर्घटना घडलेल्या नाहीत. सुरक्षित प्रवासासाठी मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाळी पेट्रोलिंग सुरु होत आहे. त्यासाठी रेल्वे मार्गावर चोविस गस्त आणि असुरक्षित ठिकाणी स्टेशनरी वॉचमन तैनात केला जाणार आहे. तसेच या मार्गावरील वेगही प्रतिबंधित केला आहे. अतिवृष्टी झाल्यास लोको पायलटस्ना 40 किमी प्रतितास वेगाने गाड्या चालवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
आपत्कालासाठी स्वयं-चालित एआरएमव्ही (अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन), एआरटी (अपघात निवारण ट्रेन) सज्ज आहे. तसेच या परिस्थितीत संपर्कासाठी कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन, वॉकी-टॉकी सेट दिले आहेत. प्रत्येक रेल्वे स्थानकावर 25 वॅट व्हीएचएफ बेस स्टेशन सज्ज आहे. ट्रेनमधील कर्मचारी आणि स्टेशन मास्टर यांच्यातील संभाषणासाठी वायरलेस सुविधा दिली आहे. तसेच रेल्वे मार्गावर सरासरी 1 किमी अंतरावर आणीबाणी संप्रेषण (ईएमसी) सॉकेट्स बसवली आहेत. त्याचा वापर करुन गस्ती नियंत्रक, वॉचमन, लोको पायलट्स, गार्ड आणि इतर क्षेत्र देखभाल कर्मचारी स्टेशन मास्टर व नियंत्रण कार्यालयात संपर्क साधतात.एआरएमव्हीमध्ये उपग्रह फोनही बसविला असून सर्व सिग्नलसाठी एलईडी
बल्बचा वापर केला आहे.
माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कनकावली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी येथे पाऊस पडण्याची स्वयं-चलीत यंत्रणा बसवली आहे. पावसाचा जोर वाढल्यास अधिक सतर्कतेच्या सुचना देणे शक्य होत आहे. बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथील नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत राहील. पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून सुरु होणार असून 31 ऑक्टोबरपर्यंत अंमलात येईल. तौक्ते चक्रीवादळात जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस असूनही रेल्वे सेवा सुरळीत होती.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*