खेड: संशयित मद्यपी बसचालक अपघातानंतर तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला.

या घटनेत बसचालकाने मद्यप्राशन केल्याच्या संशयावरून संतप्त ग्रामस्थांनी चालक आणि वाहकाला धारेवर धरले.

या प्रकरणाची चौकशी करून एसटी महामंडळाने चालक मंगेश आहाके याला तीन महिन्यांसाठी निलंबित केल्याची माहिती खेड आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के यांनी दिली.

या घटनेचा व्हिडीओ ग्रामस्थांनी मोबाईलवर चित्रित करून सोशल मीडियावर व्हायरल केला, त्यामुळे तालुक्यात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

खेड एसटी आगारातून दि. 23 रोजी सायंकाळी 6 वाजता खेड-पन्हाळजे बस (क्रमांक: एम. एच. 14 बी. टी. 2597) प्रवाशांना घेऊन निघाली होती.

या बसमध्ये वाहक गजानन केंद्रे आणि चालक मंगेश आहाके होते.

बहिरवली मार्गावरून भरधाव वेगाने धावणारी ही बस सवणस गावाजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक: एमएच 08 बी. जी. 5584) धडकली.

प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थ निसार सुर्वे यांनी सांगितले की, बस रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने थेट दुचाकीच्या दिशेने आली.

यावेळी दुचाकीवर स्वार असलेल्या तीन मुलांनी जीव वाचवण्यासाठी बाजूला उडी मारली आणि दुचाकी सोडून दिली.

त्यामुळे त्यांचा जीव वाचला, परंतु दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

अपघातानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी चालक आणि वाहकाला जाब विचारला.

यावेळी चालक मंगेश आहाके गणवेशात नसून त्याने मद्यप्राशन केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

या घटनेचा व्हिडीओ बनवून ग्रामस्थांनी तो सोशल मीडियावर प्रसारित केला, जो जिल्हाभर वाऱ्यासारखा पसरला.

या घटनेनंतर सोमवारी सकाळी 7 वाजता चालक आहाके याने बस पन्हाळजेवरून खेड स्थानकात आणली.

त्यानंतर त्याला कोणत्याही मार्गावर बस चालवण्यासाठी पाठवण्यात आले नाही.

या प्रकरणात 24 मार्च रोजी सायंकाळी उशिरापर्यंत खेड पोलिस ठाण्यात किंवा आगार व्यवस्थापकांकडे कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती.

तरीही, एसटी महामंडळाने स्वत:हून चौकशी सुरू केली असून चालकावर निलंबनाची कारवाई केली आहे.

मद्यपी चालकाने बस चालवल्याच्या या घटनेमुळे एसटी प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात अशा घटना वारंवार समोर येत असून, याबाबत कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*