खेड : तालुक्यातील वाडीजैतापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रदीप बाळकृष्ण दळवी (वय ३६) या नराधमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी शुक्रवारी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

जून २०१७ मध्ये घडलेल्या या घटनेत, पीडित मुलगी घरी जात असताना आरोपीने तिला जवळच्या झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

तसेच, मुलीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदवली.

सरकारी वकील ॲड. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. न्यायालयाने ॲड. जाडकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठावला.