खेड न्यायालयाने संजय कदम, वैभव खेडेकरसह ३३ जणांची केली निर्दोष मुक्तता

खेड : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानानंतर बेकायदेशीर रॅली काढून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या आरोपातून माजी आमदार संजय कदम, मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह ३३ जणांची प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयितांच्या वतीने ॲड. अश्विन भोसले यांनी युक्तिवाद केला.

२०१९ मध्ये संजय कदम विधानसभा निवडणुकीत उमेदवार होते. २१ ऑक्टोबर २०१९ रोजी मतदान प्रक्रिया सुरू असताना, मतदानानंतर संजय कदम, वैभव खेडेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी सायंकाळी चारचाकी वाहने आणि दुचाकींवरून कर्णकर्कश हॉर्न वाजवत रॅली काढली होती. भरणे येथील काळकाई मंदिराजवळ रात्री ८.३० वाजता पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता, संजय कदम यांनी ‘रॅली काढणारच, तुम्ही गुन्हा दाखल करायचा तो करा’ असे पोलिसांना सुनावले.

या प्रकरणात आचारसंहितेसह मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत संजय कदम, सायली संजय कदम, साहिल संजय कदम, वैभव खेडेकर, अजय रमेश पिंपरे, तौसिफ शौकत सांगले, प्रमोद पांडुरंग जाधव, धीरज सुनील कदम, ओंकार प्रकाश कदम, पंकज पांडुरंग जाधव, दादू नांदगांवकर, स. तू. कदम, सुनील दत्ताराम चव्हाण, प्रसाद कदम, विनोद तांबे, विजय जाधव, सुरेश मोरे, राहुल कोकाटे, बाबा मुदस्सर, प्रकाश शिगवण, सतीश वसंत कदम, सचिन जाधव, इम्तियाज खलिफ, प्रदोष सावंत, चेतन धामणकर यांच्यासह इतरांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. ॲड. भोसले यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने ३३ जणांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात २८ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*