कुमार विश्वास यांच्याकडून मात्र गंभीर आरोप
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असल्याची नवीन योजना पंजाबच्या प्रचारादरम्यान जाहीर केली. तर दुसरीकडे कुमार विश्वास यांनी केजरीवाल यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी केजरीवाल यांनी आतापर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी आणि महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असून, महिलांना बळ देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
दरम्यान, आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नेहमीच खलिस्तानच्या समर्थनात आहेत. मी त्यांच्यासोबत असताना ते मला त्यांच्या योजनांबद्दल सांगत असत. मी एकतर पंजाब राज्याचा मुख्यमंत्री होईन किंवा स्वतंत्र देशाचा पहिला पंतप्रधान होईन, असे एका दिवशी ते आपल्याला म्हणाले होते, असेही विश्वास यांनी सांगितले. केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांची मदत घेण्यात अजिबात संकोच वाटत नाही, असा आरोपही त्यांनी केला.