जगातील सर्वात मोठ्या औषध कंपन्यांपैकी एक असलेल्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने एक मात्रेच्या करोना प्रतिबंधक लशीच्या वैद्यकीय चाचण्यांबाबत भारत सरकारशी चर्चा सुरू केली आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देताना कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की ‘जॅन्सेन कोविड १९’ लशीवर भारतात वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यावर सरकारशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यात इतर स्थानिक नियमनात्मक परवानग्यांचा समावेश असेल. अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या एक मात्रेच्या लशीला वापरासाठी फेब्रुवारीत परवानगी दिली होती. आतापर्यंत बाजारात आलेल्या सर्व लशी दोन मात्रांच्या असल्याने त्यात गोंधळाचाच भाग अधिक आहे. त्यामुळे एका मात्रेच्या लशीची प्रतीक्षा आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची जॅन्सेन कोविड १९ लस साध्या प्रशीतक (रेफ्रिजरेटर) तापमानाला साठवता येते. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी या लशीच्या सुरक्षितता व प्रभावशीलतेवर भर देत असून जगातील लोकांसाठी ही लस स्थानिक अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास वापरता येऊ शकते. सध्या कोविड १९ विषाणूवर ऑक्सफर्ड विद्यापीठ व अॅस्ट्राझेनेका कंपनीची एक लस उपलब्ध आहे. दुसरी लस भारत बायोटेकची असून ती कोव्हॅक्सिन नावाने प्रचलित आहे. ती भारताची स्वदेशी लस असून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व भारतीय वैद्यक संशोधन परिषद यांनी तयार केलेली आहे.