मुंबई -असंघटीत क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने असंघटीत कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात यावे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने सुरु करण्यासंदर्भात कामगार विभागामार्फत संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करणाऱ्या विविध विभागांच्या यंत्रणाची मदतसेवा व जबाबदार अधिकारी यांचा कार्यकर्ते व सामाजिक संघटनांशी नियमित समन्वय सुरु करावा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या. असंघटित कामगारांच्या प्रश्नासंदर्भात आज विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने बैठक झाली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्यासह कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद- सिंघल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) पंकज कुमार, आरोग्य संचालक डॉ.साधना तायडे, सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे, सुनीती, यांच्यासह पत्रकार संजय जोग, आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.