मुंबई : देशभरात विविध खेळ व खेळणी तयार करण्याच्या माध्यमातून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कल्पकतेला आणि सृजनशीलतेला चालना देण्याच्या हेतूने सोबतच या क्षेत्राला चालना मिळण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच देश पातळीवर पहिली भारतीय खेळणी जत्रा ऑनलाइन पद्धतीने भरणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद यांच्या मार्फत देशातील पहिली भारतीय खेळणी जत्रा 2021चे ऑनलाईन पद्धतीने 27 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 27 फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. या देशपातळीवर होणाऱ्या खेळणी जत्रेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ,औरंगाबाद,अमरावती ,पुणे या चार विभागातील स्टॉल असून हे स्टॉल महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.