दापोली (मळे) : मळे गावातील फिलसेवाडी येथे कृषी जीविका गटाच्या वतीने माहिती केंद्राचे उद्घाटन 26 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता स्थानिक मीटिंग हॉलमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांनी आणि शाळकरी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदवला.
माहिती केंद्रात शेतकऱ्यांसाठी पिकांच्या सुधारित जाती, खते, लाखीबाग, मृदा नमुना पद्धती, पशुखाद्य आणि शासकीय योजनांची माहिती देणारे फलक प्रदर्शित करण्यात आले. याशिवाय आधुनिक कृषी अवजारे, अजोला संवर्धन, विविध बियाणे, सेंद्रिय खते आणि पशुखाद्याचे नमुनेही शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ठेवण्यात आले. या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक आणि शास्त्रीय शेती पद्धतींची माहिती करून देणे हा होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच श्री. दिनेश अडविलकर यांच्या हस्ते झाले. गावातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शनाला भेट दिली. विशेष बाब म्हणजे, गावातील शाळेतील विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि कृषीविषयक माहिती उत्साहाने आत्मसात केली. प्रदर्शनातील चार्ट्स आणि प्रात्यक्षिक साहित्य पाहून शेतकरी प्रभावित झाले आणि त्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची नोंद पुढील मार्गदर्शनासाठी करण्यात आली.
या प्रसंगी RAWE कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण झगडे आणि कृषी अर्थशास्त्र विषय तज्ज्ञ डॉ. दीपक मळवे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रेरणा मिळाली.