दापोली – गेल्या आठवड्यात नगरपंच्यातीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी डॉक्टरांची बैठक बोलावली होती. पण एकाद दुसऱ्या डॉक्टरांना सोडून कोणीही या बैठकीला आलेलं नव्हतं. त्यावर अनेक मान्यवरांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशा आशयाचं दुसरं पत्र नगराध्यक्षा परवीन शेख यांनी डॉक्टरांना पाठवलं होतं. त्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन दापोली शाखेच्या वतीनं डॉक्टर हजर न राहिल्या प्रकरणी नगराध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त केली असल्याची माहिती माय कोकणच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

नगराध्यक्षांनी बोलावलेल्या बैठकीत अनावधानाने आणि गैरसमजामुळे आम्ही उपस्थित राहू शकलो नाही असं इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा दापोलीच्या वतीनं पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. नगराध्यक्ष परवीन शेख यांनी दापोली डॉक्टर्स असोसिएशन नावानं पत्र पाठवलं होतं. ही दुसरी कोणती तरी संघटना आहे असा समज अमचा झाला होता, त्यामुळेच आम्ही या बैठकीला हजर राहू शकलो नाही असं पत्रात म्हटलं गेलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्यात मिटिंग घ्यायचीच असेल तर ती व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घ्यावी अशी विनंतीही आयएमएकडून करण्यात आली आहे. ऑनलाईन बैठकीला डॉक्टरही मोठ्या संख्येनं उपस्थित राहितील असंही पत्रामध्ये म्हटलं गेलं आहे.

चौकट

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष परवीन शेख यांनी दुसरं पत्रही दापोली डॉक्टर्स असोसिएशन, दापोली या नावानं पाठवलं होतं. या पत्रालाच डॉक्टरांनी वरील उत्तर दिलं आहे. यावेळी मात्र कोणताही गैरसमझ डॉक्टरांना झाला नाही.

कोरोनाशी मुकाबला सर्वांनी मिळून करायचा आहे. अशा वेळी मानअपमान अशा गोष्टी बाजूला करून प्रत्येकानं एकत्रीतपणे लढणं आवश्यक आहे. आमच्यासाठी हा विषय आता संपलेला आहे. रूग्णांच्या सेवेसाठी आम्ही सतत काम करत राहणार आहेत.

डॉ. प्रशांत मेहता

इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा दापोलीचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ रानडे यांच्याकडेही आम्ही संपर्क साधला होता. पण त्यांनी याविषयावर बोलण्यास नकार दिला आहे. नो कमेंट्स एवढीच प्रतिक्रिया त्यांनी दिली.

डॉ. कौस्तुभ रानडे