निवडून आल्यानंतर उत्पल पर्रीकर पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत याची हमी जर त्यांनी दिली तर त्यांना पाठिंबा देण्याबाबत विचार करू, असे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवारी) सांगितले. पणजी मतदारसंघातून शिवसेनेने जाहीर केलेला उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहे. पुढील जो काही निर्णय असेल तो खासदार संजय राऊत व पक्षप्रमुख घेतील असे ते म्हणाले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या पुढाकाराने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाली आहे. युतीनंतर शिवसेनेने १० मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीच राज्यातील निवडणुकीचे नियोजन कसे सुरु आहे हे पाहण्यासाठी मी आज आलो आहे. असे सामंत म्हणाले. तरुण, भूमिपुत्र यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे एक संघटन स्वयंरोजगारावर उभे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.