दापोली : सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या दापोली तालुक्याची महती सांगणाऱ्या ठसकेबाज गाण्याचे लवकरच ‘रेकॉर्डिंग’ आणि शूटिंग होणार आहे. २१ आणि २२ जानेवारी २०२१ दरम्यान दापोली शहरातील पेन्शनर हॉलमध्ये ऑडिशन होणार आहे.

प्रसिद्ध संगीतकार हरीश चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे शब्द कोकणातील प्रसिद्ध गझलकार आणि कवी कैलास गांधी यांचे आहे. तालुक्यातील सुमारे ३५ हुन अधिक गायक, कलाकार या गाण्याला आवाज देणार आहेत.

या गाण्यासाठी लवकरच गायकांची तसेच कलाकारांची ऑडिशन घेतली जाणार आहे. यामधून निवड झालेल्या गायक, कलाकारांना या गाण्यामध्ये संधी देण्यात येणार आहे.

ऑडिशनसाठी दिप्ती शेवडे ९५२९९९०८७०, नंदिता पतंगे ७३८७१५३७४० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या गाण्यामध्ये नृत्य तसंच इतर गोष्टींसाठी देखील स्थानिक कलाकारांचा सहभाग घेतला जाणार आहे. दापोलीकरांनी केलेलं दापोलीचं गाणं अशी या गाण्याची ओळख चिरकाल राहील असा विश्वास संगीतकार हरीश चव्हाण यांनी व्यक्त केला.

हरिश चव्हाण, संगीतकार

हरीश चव्हाण गेली २८ वर्ष संगीतक्षेत्रात झी व सोनी बरोबर पार्श्वसंगीत व संगीतकार म्हणून कार्यरत आहेत. नामवंत गायक उषा मंगेशकर, सुरेश वाडकर, उदित नारायण, कविता कृष्णमुर्ती, अनुराधा पौडवाल, वैशाली माडे, वैशाली सामंत, रिचा शर्मा यांच्यासोबत संगीतकार म्हणून तर रविंद्र जैन यांच्यासोबत संगीत संयोजक म्हणुन काम केले आहे.

संगीतकार म्हणुन “हिरवं कुंकू” हा त्यांचा चित्रपट गाजला होता. हिंदी मध्येही त्यांनी बोहरा फिल्म्स् सोबत व रायटर सुधाकर शर्मा सोबत संगीतकार म्हणून काम केले आहे. सामाजिक आणि संस्कृती ओळख अनेक माध्यमांनी मांडली आहे.

कोकणातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ, थंड हवेचे ठिकाण यामुळेच दापोलीला ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखले जाते. विकेंड्स तसेच जवळजवळ सगळे हॉलिडे्जमध्ये दापोली हाऊस फुल असते. दापोलीतील समुद्रकिनारे, अध्यात्मिक स्थळे, ऐतिहासिक दस्तऐवज यावर पर्यटकांच्या उड्या पडतात.

यामुळे दापोलीचे असे स्वतःचे एक ठसकेबाज गीत असावे अशीच संकल्पना हरीश चव्हाण यांनी मांडली. याला दापोलीतील सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांनी पसंती दिला. निर्माती दिप्ती शेवडे यांनीही याला दुजोरा दिला.

गाणे लिहून झाले असून त्याला स्वर-साज देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे .लवकरच या गाण्याचे रेकॉर्डिंग केले जाणार असून दापोलीतील विविध ठिकाणांवर या गीताचे चित्रीकरण देखील केले जाणार आहे.

त्यामुळे लवकरच दापोलीकर ‘वाट घम घम वळणाचा रस्ता…. कोलीम भाकरी मच्छीचा रस्ता…. बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली’ या गाण्याच्या डीजेवर थिरकताना दिसणार आहेत.

चौकट
शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, माता रमाई, लो. टिळक, महर्षी कर्वे यांच्या भूमिकेत बसू शकतील असे चेहरे, मावळे, मंगळागौरसाठी बायका, पालखी सोहळा, बाल्या डान्स मुले, वारकरी संप्रदाय, नवरा – नवरी अशा भूमिकांसाठी फक्त दापोली तालुक्यातील क्लाकारांची ऑडिशन २१, २२ जानेवारी रोजी १०.३० वा. पासून पेन्शनर हॉल येथे घेतली जाणार आहे.