रत्नागिरी: मद्यधुंद अवस्थेतील पतीने पत्नीच्या डोक्यात बिअरची बाटली मारून दुखापत केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरात घडली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत कृष्णा गमरे (वय ३९, रा. बुरंबाड, ता. संगमेश्वर, रत्नागिरी) असे बिअरची बाटली मारणाऱ्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. २५) दुपारी तीनच्या सुमारास शांतीनगर येथील पायवाटेवर घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला घरकाम करून पायवाटेने घरी जात होत्या. त्याचवेळी त्यांचा पती प्रशांत कृष्णा गमरे दारूच्या नशेत हातात बिअरच्या बाटल्या घेऊन तेथे आला आणि त्याने पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर पिशवीतून बिअरची बाटली काढून पत्नीच्या डोक्यात मारली. तसेच, दुसरी बाटली मारण्याचा प्रयत्न केला असता पत्नीने प्रतिकार केला.

यानंतर पती तेथून पसार झाला. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली असून, महिलेने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.