होम क्वारंटाइनचा कालावधी आता 7 दिवस

मुंबई – राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याने तिसरी लाट येण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने सरकारने काही निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी आता सात दिवसांचा करण्यात आला आहे.

या आधी हा कालावधी 10 दिवसांचा होता. सात दिवसांच्या होम क्वारंटाईननंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात करोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. ही संख्या काही दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातील 90 टक्के लोकांना लक्षणे नाहीत. उर्वरित 10 टक्‍क्‍यांमध्ये 1-2 टक्के रुग्णालयात उपाचारासाठी दाखल आहे. ही एका अर्थाने सकारात्मक बाब आहे.

तसेच पुढील काळात पुन्हा अँटिजेन चाचण्यांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी आता चौका-चौकात अँटिजेन चाचणीसाठी बुथ उभारण्यात येणार आहे. अँटिजेन पॉझिटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय अद्याप ज्यांनी लस घेतलेली नाही अशा नागरिकांसाठी कठोर पावले उचलणे आवश्‍यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊनची गरज नाही

राज्यातील सद्यपरिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नाही. पण वाढती रुग्णसंख्या पाहता काही निर्बंध लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निर्बंध तातडीने लागू होणार नाहीत. योग्यवेळी निर्णय घेण्यात येणार आहे. सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*