पावस : पावस पंचक्रोशीत शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ढगफुटीसारख्या पावसामुळे बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, तर गोळप मानेवाडी येथे दरड कोसळल्याने पाच दुचाकी गाड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या. सागर मोहिते यांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील सामानाचेही मोठे नुकसान झाले. एकूण १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. सायंकाळी ६.३० ते ७.३० च्या दरम्यान बाजारपेठेत पाणी साचले, गटारी तुंबल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. संतोष सुर्वे, फारुख मुकादम, मेहबूब टेमबरीकर, स्वप्निल खातू, तेज खातू, विकास वैद्य, अकबर इनामदार, रऊफ सावकार, फजल सावकार, फकीर सावकार, महमूद हवालदार, अजिज हवालदार, रऊफ हवालदार, उस्मान हवालदार, मुसवीर नाखवा, शौकत नाखवा, सुनील खातू, सत्यवान नानरकर, शिल्पेश पाटील यांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले. खाडीकिनारी असलेल्या या दुकानांना मोठा फटका बसला. तलाठी चौगुले यांनी पाहणी करून पंचनामा केला.



१३ जून रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गोळप मानेवाडी येथील साई मंदिराजवळ सागर मोहिते यांच्या घराजवळ दरड कोसळली. पाच दुचाकी गाड्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या, तर घरात पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले. तलाठी मुरकुटे, पोलीस पाटील निलेश भाटकर यांनी पंचनामा केला. जेसीबीच्या साहाय्याने दुचाकी बाहेर काढण्यात आल्या. पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता, सागर मोहिते, संजय आग्रे, संतोष मोहिते, रमाकांत मोहिते, समीर मोहिते, सुरज डोंगरे, राजेश डोंगरे, मुकुल माने यांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले. २०१९ मध्येही या परिसरातील काही घरांना भेगा गेल्या होत्या. आता संरक्षक भिंतीसाठी शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. उपसरपंच संदीप तोडणकर आणि भाजपा तालुकाध्यक्ष दादा दळवी यांनी घटनास्थळी भेट दिली.