राजापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी अधूनमधून श्रावणसरी कोसळत आहेत. सलग चार दिवस वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.
राजापूर तालुक्यातील शिरसे येथे मंगेश शिर्सेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने घराच्या छपराचे नुकसान झाले. यात शिर्सेकर यांच्या आईच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ४९.६८ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड ५२ मिमी, खेड ७१.५७ मिमी, दापोली ५७.४२ मिमी, चिपळूण ६०.८९ मिमी, गुहागर २५.२० मिमी, संगमेश्वर ३५.९१ मिमी, रत्नागिरी २६.४४ मिमी, लांजा ५१.६० मिमी आणि राजापूरात ६६.१२ मिमी पावसाची नोंद झाली.
काल दिवसभर जोरदार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून घरे आणि गोठ्यांचे नुकसान झाले.
मात्र, रविवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असून, दुपारी सूर्यदर्शनही झाले.
मागील पाच दिवसांपासून राजापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम होता. शिरसे येथील मंगेश शिर्सेकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडल्याने नुकसान झाले.
याशिवाय, भालावली खालचा भंडारवाडा येथे रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी झाड तोडून रस्ता मोकळा केल्याने सकाळी वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
तसेच, याच ठिकाणी झाड कोसळल्याने विजेचा खांब पडला, ज्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला होता. सुदैवाने, पावसाचा जोर कमी झाल्याने तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली नाही.
दरम्यान, खेड येथील जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याचा अंदाज आहे.