दापोली (साखळोली) : देशाचं भवितव्य सक्षम कन्या आणि सक्षम नारी यांच्यावर अवलंबून आहे. स्त्री हा घराचा पाया आहे, त्यामुळे तिचं स्वास्थ्य आणि आरोग्य चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून साखळोली नं. १ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित आरोग्य शिबिरात प्राथमिक वैद्यकीय अधिकारी श्री. अमोल सानप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या शिबिरात गावच्या प्रथम नागरिक श्रीम. दिक्षा तांबे यांनी महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचं, मुलांना चांगलं शिक्षण आणि संस्कार देण्याचं, तसेच सकस आहार देण्याचं आवाहन केलं.

या शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी शशिकांत कदम यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणी, मोफत औषधे आणि उपचार, असंसर्गजन्य आजार तपासणी व उपचार, रक्त तपासणी, गरोदर मातांची तपासणी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर, क्षयरोग तपासणी, तसेच किशोरवयीन मुलींची आरोग्य तपासणी अशा विविध सेवा देण्यात आल्या. या शिबिराचा सुमारे ८७ रुग्णांनी लाभ घेतला.

यावेळी सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शांताराम शिंदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वेभवी गोरीवले, शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता, पोलीस पाटील सुनिल गौरत, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण बर्बे यांच्यासह अनेक वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी किरण आंधळे, निखिल शेळके, आरोग्य सहाय्यक रमेश उमते, पंचक्रोशीतील अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र साखळोली येथील सर्व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समुदाय आरोग्य अधिकारी वाकवली, गोकूळ ढाकणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिबिराचे आयोजक शशिकांत कदम यांनी केलं.