ज्यांना २०१४ साली देश निर्माण झाला असं वाटतं त्यांना राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला “; शिवसेनेचा भाजपाला टोला

मुंबई – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये केलेल्या भाषणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. राहुल गांधींनी या भाषणात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून भाजपाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर याच मुद्द्यावरून शिवसेनेने राहुल गांधींचे या भाषणासाठी कौतुक केले आहे. मात्र, असे करताना भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधण्यात आला आहे.

सामनामधील अग्रलेखातून शिवसेनेने भाजपाच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधींच्या भाषणावर टीका करणाऱ्या भाजपाला शिवसेनेने चांगले खडेबोल सुनावत “विरोधकांच्या भाषणावेळी पंतप्रधानांनी उपस्थित राहावं असे संकेत आहेत. पं. नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळ्यांनीच ही परंपरा पाळली आहे. अटलजींच्या सरकारविरोधी भाषणाचे पं. नेहरूंनी कौतुक केले आहे. बॅ नाथ पैंच्या भाषणावेळीही नेहरू हजर राहात. मधू लिमये, मधू दंडवते यांच्या भाषणात सत्तापक्षाने व्यत्यय आणला नाही. मोदी इंदिरा गांधी सरकारचे वाभाडे काढत, पण भाषण संपताच इंदिरा गांधी लगेच मोदींना चिठ्ठी पाठवून भाषणाचे कौतुक करत असत. आता ते दिलदारीचे वातावरण संपले आहे. राहुल गांधींच्या भाषणावर संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छेतेच्या भाषेत टीका केली आहे”, असे अग्रलेखात म्हटले गेले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारची देशद्रोहाची व्याख्या बदलल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. “देशातील जनतेचे १५ हजार कोटी रुपये मोदी सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी करण्यासाठी वापरले, ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह आहे. पण विरोधकांना यावर संसदेत बोलू दिले जात नाही. सरकारच्या देशद्रोहावर बोलणे म्हणजेच देशद्रोह असा नवा फंडा तयार झाला आहे”, असे अग्रलेखात म्हटले आहे.

दरम्यान, राहुल गांधींच्या संसदेतील भाषणाविषयी शिवसेनेनं आपली भूमिका मांडली आहे. “२०१४ साली देश निर्माण झाला असं ज्यांना वाटतं, त्यांच्यासाठी राहुल गांधींनी डोक्याला शॉट दिला आहे. माझे पणजोबा देशासाठी १५ वर्ष तुरुंगात होते, माझ्या आजीने देशासाठी शरीरावर ३५ गोळ्या झेलल्या. माझे वडील देशासाठी हुतात्मा झाले. तुम्ही मला काय देश शिकवता? असा तीर राहुल गांधींनी सोडला आणि सत्ताधारी घायाळ झाले”, असे शिवसेनेने म्हटले आहे.

“चीनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनी एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधींनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच”, असा टोला देखील अग्रलेखात लगावण्यात आला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*