
गुहागर : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असून सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
गुहागर पंचायत समितीमध्ये शिवसेना आणि भाजप महायुतीची सत्ता असून निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले होते.
या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे घोषित केले.
कोंडकारुळ गावचे रहिवासी असलेल्या प्रणव पोळेकर यांनी आपल्या कार्यक्षमतेमुळे आणि दांडगा जनसंपर्कामुळे पक्षात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, तर भाजपचे निलेश सुर्वे यांनी त्यांच्या नेतृत्वगुणांच्या जोरावर उपसभापतीपद मिळवले आहे.
निवडीनंतर बोलताना दोन्ही नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा मानस व्यक्त केला. या निवडीमुळे राजकीय वर्तुळात तरुण नेतृत्वाला वाव मिळाल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली असून, निवडीची घोषणा होताच गुहागर शहरासह ग्रामीण भागात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरातून पोळेकर आणि सुर्वे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply