भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी केलेल्या मागणीला यश

दापोली:- दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथे म्युनिसिपल डिस्पेन्सरीसाठी बांधलेली इमारत खासगी कोविड सेंटरसाठी देण्यासाठी जिल्हा प्रशासन राजी झाले आहे. दापोलीतील श्री स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलला ही जागा देण्यात यावी, असे पत्र जिल्हाधिकारी यांनी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांना पाठविले आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे यांनी केलेल्या मागणीला यश आले आहे. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयातील डीसीएचसीमध्ये बेडची संख्या कमी पडत असून खासगी कोविड रुग्णालयामधील बेडची संख्याही कमी पडत आहे. रुग्णांना उपचारासाठी दापोलीबाहेर जावे लागू नये, यासाठी दापोलीतील स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे वतीने दापोली नगरपंचायतीची केळसकर नाका येथील म्युनिसिपल डिस्पेनसरीसाठी बांधण्यात आलेली इमारत खासगी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी भाड्याने मिळावी, यासाठी नगरपंचायतीकडे ७ एप्रिलला मागणी केली. अर्जावर विचार करण्यासाठी १० एप्रिलला नगराध्यक्षांनी ऑनलाइन
सभा आयोजित केली. नंतर ती रद्द केली. १४ एप्रिलपर्यंत खासगी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी जाहिरात द्यावी, असे ठरविले होते. स्वामी समर्थ रुग्णालयाच्या वतीने अर्ज सादर केला होता. कोविड केअर सेंटर उभारणीसाठी जागा विनामोबदला देण्याबाबतचे पत्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्यांनी व उपनगराध्यक्षांनी नगराध्यक्षांकडे दिले होते. त्यानुसार नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सदर इमारतीत कोविड केअर सेंटर उभे करावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला सदर इमारत खासगी कोविड सेंटर सुरू करण्यासाठी द्यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. हाच प्रस्ताव १० एप्रिलला पाठविला असता तर विलंब झाला नसता. दापोली नगरपंचायत व श्री स्वामी समर्थ मल्टिस्पेशालिटी रुग्णालय यांच्यात करार करण्यात येईल व पुढील कार्यवाही होईल.