सिंधुदुर्ग:- राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केलीय. तसंच आयुष्यभर महाविकास आघाडीचे सरकार नसेल हे पोलिस प्रशासनानेही लक्षात घ्यावं. तत्‍कालीन पोलिस आयुक्‍त परमविर सिंग यांनी महाविकास आघाडी सरकारच्या इशाऱ्यावर काम केलं. पण ते अडचणीत असताना आता त्‍यांना वाचवायला कुणीही आलेलं नाही. हे देखील पोलिसांनी लक्षात घ्यावं असा इशारा आमदार नीतेश राणे यांनी आज दिला.

पडवे येथे राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्‍हणाले, भाजपचा जो जो नेता सरकारच्या विरोधात बोलतोय, त्‍याला महाविकास आघाडी अडकविण्याचा प्रयत्‍न करतंय.
संतोष परब हल्‍ला प्रकरण, आमच्या मुंबईच्या घराचं प्रकरण यात आम्‍हाला नाहक त्रास देण्याचा प्रयत्‍न केला. तसाच प्रकार आता भाजपच्या इतर नेत्‍यांविरोधात सुरू आहे. मात्र आघाडी सरकारने एक लक्षात घ्यावं की सुरवात तुम्‍ही केलीय आणि त्‍याचा शेवट मात्र भाजप करणार आहे.