शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक-राज्य वित्त मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 22 : राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या कर्मचा-यांच्या कुटूंबाला निवृत्ती वेतन आणि वैद्यकिय कारणास्तव कर्मचा-याने निवृत्ती घेतल्यास रुग्णता निवृत्ती वेतन लागू करणे. तसेच केंद्र शासनाच्या सेवानिवृत्ती योजनाप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचा-यांनाही योजना लागू करण्यासंदर्भात अभ्यासगटाद्वारे साकल्याने विचार करून शासनास शिफारस करण्यात येणार असल्याचे वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सेवेत सन २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेल्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन (NPS) योजनेतील (पूर्वीच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना- DCPS) त्रुटीचा अभ्यास करण्यासाठी राज्य मंत्री (वित्त)यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास गटासमवेत कर्मचारी संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री देसाई बोलत होते. या बैठकीस वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव श्री.नितीन गद्रे यांच्यासह अधिकारी , कर्मचारी आणि विविध संघटनेचे सचिव उपस्थित होते.

वित्त राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, अभ्यासगटात या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल. निवृत्ती वेतन योजनेतील त्रूटी आणि शासनावर येणारा आर्थिक भार यासदंर्भात अभ्यास करून शासनास शिफारशी करण्यात येणार असल्याचेही श्री देसाई यांनी यावेळी सांगितले.

विविध संघटनेने केलेल्या मागणीप्रमाणे कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्ती वेतन मिळावे तसेच सेवेत असताना वैद्यकीय कारणास्तव कर्मचारी निवृत्त झाल्यास अशा कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्ती वेतन लागू करण्याची शिफारस शासनास अभ्यासगटाद्वारे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*