आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या”, संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला!

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात नेहमी राजकीय कलगीतुरा रंगताना दिसत असतो. पण राज्यात सध्या सत्ताधाऱ्यांमध्येच राजकीय कलगीतुरा रंगताना दिसू लागला आहे. आणि तो रंगतोय स्वबळावरून! काँग्रेस राज्यात करत असलेल्या स्वबळाच्या भाषेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांमध्ये फटकारलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील काँग्रेसला खोचक सल्ला देत त्यांच्या स्वबळाच्या भूमिकेची खिल्ली उडवली आहे. “त्यांनी आधी पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

“एक नेता स्वबळ म्हणतो, दुसरा ती भूमिका नाही म्हणतो!”

संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खोचक टोमणा मारला आहे. “महाराष्ट्रातील अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षात देखील एक नेता म्हणतो आम्ही स्वबळावर लढणार, दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे आधी त्या सगळ्यांनी गोंधळातून बाहेर यावं. आणि नंतर स्वबळ वगैरे काय आहे त्यावर निर्णय घ्यावा”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी “आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढवणार”, असं जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी पाटील यांनी याबाबत ठाम भूमिका मांडण्याचं टाळलं होतं.

शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार!

दरम्यान, यावेळी संजय राऊत यांनी शिवसेना कोणत्याही प्रकारे निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचे सूतोवाच केले. “उद्धव ठाकरेंनी काल राज्यातल्या जनतेला आणि शिवसैनिकांना जी दिशा दिली, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईसाठी कायम तयार आहे. बळावर वा स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर”, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे हा काँग्रेससाठी अप्रत्यक्ष इशारा असल्याचं मानलं जात आहे.

“राज्याच राजकीय शांतता नांदायची असेल, तर…”

रविवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी इतरही राजकीय पक्षांना इशारेवजा सल्ला दिला आहे. “अंगावर याल तर शिंगावर घेऊ हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्र कुणाच्या वाट्याला जात नाही. शिवसेनाही कुणाच्या वाट्याला जात नाही. आणि कुणी अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे राज्यात तर राजकीय शांतता नांदायची असेल, तर प्रत्येकानं आपापली जबाबदारी आणि कर्तव्य पाळलं पाहिजे. राजकारणासाठी राजकारण आणि विरोधासाठी विरोध करू नये. या काळात राडेबाजी करणार असाल, तर लोक चपलेनं मारतील हे आपल्या मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगावं लागलं, यातच सगळं आलं आहे”, असं ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*