होळीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने चाकरमनी कोकणात जात असतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते दरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त १०० अधिक एसटी सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
१६ मार्च ते १७ मार्च या काळात १०० ज्यादा एसटी गाड्या कोकणातील मार्गावरुन धावतील. या गाड्यांचे नियोजन करण्यासाठी एसटी आगारांमध्ये एसटीचे अधिकारी, पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांनी या एसटी मधून प्रवास करावा असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.
कोकणात जाण्यासाठी प्रवाशांना एसटीचा पर्याय सुलभ असतो मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एसटी संपामुळे अनेक एसटी बंद आहेत. परिणामी खासगी बसेसने प्रवाशांकडून जास्तृ तिकीट दर आकारण्यात येत आहे. परंतु ऐन सणाच्या दिवसात एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
‘या’ आगारातून सुटणार ज्यादा एसटी बसेस
१६ मार्च ते १७ मार्च दरम्यान १०० एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तर पनवेल आगारांतून खेड, चिपळून, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडीसाठी ज्यादा बसेस सोडण्याच येणार आहेत. तर पुणे, सातारा आणि सांगली भागातूनही ज्यादा बसेस एसटी महामंडळाकडून मागवण्यात आल्या आहेत.