राज्यातील वाढता करोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने १ मेपर्यंत कडक लॉकडाउन लागू केला आहे. इतर उपाय योजनांबरोबरच राज्य सरकारने लसीकरण कार्यक्रमांवरही लक्ष्य केंद्रीत केलं असून, १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्याने शनिवारी घेतला. मात्र, १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना निर्णयाची घोषणा केली.