दापोली: दशानेमा गुजर युवक संघटना आणि फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मोहन महादेव गुजर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १.०० या वेळेत फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली येथे होणार आहे.

या शिबिरात सर्जरी, ऑर्थोपेडिक, डेंटल, नेत्र तपासणी, रक्त तपासणी तसेच रक्तदाब आणि मधुमेह (शुगर) तपासणी यासारख्या विविध वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध असतील. सर्व नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपूर्ण भारतभरात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान राबवले जाणार आहे. या राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत देशभरात ७५,००० आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाईल.

आयुष्मान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि इतर स्थानिक आरोग्य सेवा केंद्रांमार्फत ही शिबिरे आयोजित होणार असून, यात प्रामुख्याने महिला आणि बालकांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या अभियानाचा मुख्य उद्देश महिल आणि बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा, जागरूकता आणि सहज प्रवेश सुनिश्चित करणे हा आहे.

महाराष्ट्र सरकारने सर्व धर्मादाय रुग्णालये, नोंदणीकृत रुग्णालये आणि ५० पेक्षा कमी, ५०-१०० आणि १०० पेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांना सामुदायिक आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

याच निमित्तानं फणसु प्राथमिक आरोग्य केंद्रातही या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ डॉक्टर रुग्ण तपासणी करणार आहेत. यात शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ. कुणाल मेहता, हाडविकार तज्ज्ञ डॉ. शेखर तलाठी, दंतचिकित्सक डॉ. वरुण मोदी, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. पवन सावंत, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलभूषण शिंदे आणि डॉ. प्रियांका शिंदे, तसेच सामान्य वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मिहीर तलाठी, डॉ. पूजा बारटक्के आणि डॉ. अपूर्व मेहता यांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फणसु प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलभूषण शिंदे आणि डॉ. प्रियांका शिंदे, तसेच दशानेमा गुजर युवक मंडळाचे अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता, उपाध्यक्ष निकेत मेहता, सचिव मयूरेश शेठ, खजिनदार स्वप्नील मेहता, कार्याध्यक्ष ऋषिकेश तलाठी, तेजस मेहता, ऋषिकेश शेठ, अमित मेहता, साहिल कडके, सिद्धेश शेठ, संकेत मेहता, आदित्य गांधी, ओंकार तलाठी, अभिजीत तलाठी आणि प्रणव तलाठी हे सर्व विशेष परिश्रम घेत आहेत.

स्थळ: फणसू प्राथमिक आरोग्य केंद्र, दापोली
दिनांक: १९ सप्टेंबर २०२५
वेळ: सकाळी ९.०० ते दुपारी १.००

सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा, अशी आयोजकांची विनंती आहे.