दापोलीत मोफत फ्लू क्लिनिकचं सोमवारी उद्घाटन

दापोली : दापोली नगरपंचायत, के.डी.ए., के.एम.ई.एस.,दापोली, आणि जे.जे.एम.एन.एम. यांच्या पुढाकारानं दापोली शहरात मोफत फ्लू क्लिनिक सुरू केलं जात आहे. विशेष करून सर्दी, ताप, खोकला असणाऱ्या रूगणांसाठी हे क्लिनिक असणार आहे. शहरातील जुन्या ग्रामपंचायतीत सोमवार दिनांक 24 ऑगस्ट 2020 रोजी या मोफत फ्लू क्लिनिकचं उद्घाटन सुप्रसिद्ध वैद्यकीय व्यवसायिक डॉ. मुनीर सरगुरोह यांच्या हस्ते होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनामध्ये दहशतीचं वातावरण आहे. कोरोनाच्या भितीनं अनेक जण आजारी असून देखील उपचारासाठी बाहेर पडत नाहीयेत. त्यांच्यासाठी हे फ्लू क्लिनिक अत्यंत उपयोगी पडणार आहे. दर सोमवारी, बुधवारी, गुरूवारी आणि शनिवारी इथं रूग्णांना तपासलं जाणार आहे. सकाळी 9.00 ते दुपारी 2.00 वाजेपर्यंत सुरू राहणाऱ्या या दखान्यात येण्यापूर्वी पूर्व नोंदणी बंधनकारक असणार आहे.

दापोलीतील सामाजिक कार्यानं झपाटलेल्या काही नागरिकांनी एकत्र येऊन या स्तूत्य उपक्रमाला मुर्त स्वरूप दिलं आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष परवीन शेख, के.डी.ए.चे डॉ. वसीम फोपळुणकर, के.एम.ई.एस.चे इकबाल परकार आणि जे.जे.एम.एन.चे जावेद सारंग यांनी केलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*