साखळोली गावातील आदर्श शिक्षक, माजी सरपंच बाळकृष्ण नवरत यांचे अल्पशा आजाराने निधन

दापोली:- साखळोली गावातील एक उतुंग व्यक्तीमत्व, सुसंस्कृत आणि आदर्श शिक्षक, एक उत्तम मार्गदर्शक, साखळोली गावचे कार्यकुशल व सर्वोत्कृष्ट प्रशासक माजी सरपंच बाळकृष्ण धोंडू नवरत यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. एक उत्कृष्ट शिक्षक, त्यांची गावाच्या विकासाप्रती असलेली तळमळ खूपच उल्लेखनीय होती. सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वसमावेशक अशी त्यांची काम करण्याची पद्धत होती. त्यांच्या सर्वसमावेशक भावनेमुळेच त्यांचे राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिक हितचिंतक नैसर्गिकरित्या तयार झाले होते. अशाच प्रकारे गुरुजींनी जपलेले समंध आणि गुरुजींचे सामाजिक कार्य यामुळेच आ.योगेश कदम, माजी आ. सूर्यकांत दळवी, माजी सभापती किशोर देसाई आणि यांच्या सारखी अनेक नेतेमंडळी त्यांच्या घरी स्वतः वैयक्तिक भेट देऊन जात असत.

ज्यावेळी गुरुजी सरपंच झाले त्यावेळी त्यांनी प्रथम गावच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधुन गावासाठी पहिली नळपाणी योजना आणली त्यानंतर त्यांनी साखळोली गावचे आराध्य दैवत श्री. ओम तेलोबा मंदिरासाठी वीज मिळावी यासाठी प्रयत्न करुन पूर्णत्वास नेले. नवरत गुरुजींनी अनेक विकास कामे सर्वांना विश्वासात घेऊन कृतींमधे आणली. त्यांनी संत गाडगेबाबा तंटामुक्त गाव योजनेचे अध्यक्षपद प्रथम स्विकारुन त्यावेळचे गावचे पोलीस पाटील सुनिल शिंदे यांना बरोबर घेऊन दिवस-रात्र न बघता प्रत्येक घरोघरी जाऊन तंटे मिटवण्यासाठी मोठा सहभाग घेतला. गाव तंटामुक्त योजना बक्षीस मिळविण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचप्रमाणे नवरत गुरुजी हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शन होतेच परंतु दापोली तालुक्यातील नेत्यांसाठी सुध्दा मार्गदर्शक होते. गेली दहा वर्ष जिल्हा नियोजन समिती सदस्य असलेले, अनेक प्रशासकीय पदांवर काम केलेले आणि सध्याचे वाकवली गावचे सरपंच श्री निलेश शेठ यांनी त्यांचा गौरव “माझा उत्तम मार्गदर्शन हरपला” असा केला आहे. गुरुजींच्या पश्चात त्यांची पत्नी मंगला बाळकृष्ण नवरत आणि तीन मुलगे आणि त्यांच्या पत्नी असा परिवार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*