मुंबई: राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. ट्विटरवर व्हिडिओ शेअर करून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. यंदा करोनाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचं वार्षिक मुल्यमापन करणं शक्य नसल्याचंही बोलून दाखवलं आहे. तसेच, मुलांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहचावं आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, हाच सरकारचा सातत्याने प्रयत्न राहिला असल्याचंही सांगितलं आहे.