रत्नागिरी : परिवहन मंत्री अनिल परब यांनी दापोली येथे बेकायदेशीर रिसॉर्ट उभे केले. मी तक्रार केल्यावर प्रशासनावर दबाव टाकून शासकीय नियमांचा भंग करून ती जागा विकली. परंतु या संपूर्ण प्रक्रियेत शासनाची फसवणूक झाली असून याबद्दल अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे. तर ही महसूल प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या तलाठी, ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

कोरोना कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड येथे उभारलेले दहा कोटी रूपयांचे रिसॉर्ट हे बेकायदेशीर असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी ते रत्नागिरी मध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

किरीट सोमय्या म्हणाले की, आपण या रिसॉर्ट विषयी तक्रार दाखल केल्यानंतर पालकमंत्री अनिल परब यांनी ग्रामपंचायतीशी पत्र व्यवहार करुन शेत जमिनीवरील रिसॉर्टसाठी बिनशेतीकर भरला. परंतु हा कर ग्रामसेवकांनी कसा काय भरुन घेतला. कागदोपत्री शेतजमिन असतानाही बिनशेतीकर कसा काय भरुन घेतला जाऊ शकतो असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

यात ग्रामसेवक व तलाठी या दोघांनाही निलंबीत करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी आपण जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. यावर योग्य ती चौकशी करण्याचे आश्‍वासन निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी दिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

या सर्व प्रकरणाला रत्नागिरीचे प्रशासनही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला  भाजपाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते.

बेकायदेशीर रिसोर्ट प्रकरणी भा.ज.पा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी घेतली जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट

पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी बेकायदेशीरपणे बांधकाम करून CRZ चे उल्लंघन, फसवणूक व मंत्रीपदाचा दुरुपयोग करून मुरुड ता.दापोली जि.रत्नागिरी येथील साई रिसोर्टचे बांधकाम केल्याप्रकरणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवार दि.२४/०५/२०२१ रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.मोहितकुमार गर्ग यांची भेट घेत याप्रकरणी चौकशी करण्याचे निवेदन दिले.

किरीट सोमय्यांबरोबर यावेळी भा.ज.पा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन,शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक उमेश कुलकर्णी उपस्थित होते.

मुरुड ता.दापोली येथे गट क्र.४१६ वर साई रिसोर्ट २०२० मध्ये बांधण्यात आला. पालकमंत्री अनिल परब यांनी आपल्या मंत्रीपदाचा दुरुपयोग करून खोटे बनावट कागदपत्र सादर करून हा रिसोर्ट उभा केला आहे. ॲड. अनिल परब यांनी काही अधिकाऱ्यांच्या सहमतीने फसवणूक करून हा रिसोर्ट बांधला.

त्यामुळे बेकायदेशीर रिसोर्ट ताबडतोब तोडण्यात यावा तसेच अनिल परब यांनी सरकारी दस्तऐवजात खाडाखोड केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी अशी मागणी किरीट सोम्मया यांनी पोलिस अधीक्षकांकडे केली. तसेच जे अधिकारी यामध्ये भागीदार झाले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. CRZ कायद्याची पायमल्ली खारफुटी, कांदळवने पाडल्याबद्दल ही अनिल परब यांच्यावर कारवाई करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

आरोप अमान्य – अनिल परब

माझ्यावर केलेले आरोप मला अमान्य आहेत. जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न आहे. या संदर्भातील खुलासे संबंधित व्यक्ती करतील असे, मंत्री अनिल परब यांनी सांगितले.