खेड: तालुक्यातील भोस्ते येथे किरकोळ वादाचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाल्याची घटना घडली आहे. गाडीने मोटारसायकलला कट मारल्याच्या संशयावरून सुरू झालेल्या वादातून हा प्रकार घडला. यात फिर्यादी आणि त्यांच्या मदतीला आलेल्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली असून, ११ जणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना ३१ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ११:१५ वाजण्याच्या सुमारास भोस्ते रेल्वे पुलाजवळच्या छोट्या सबवेच्या वळणावर घडली. संदेश संतोष पाटील (वय ३०, रा. भोस्ते, पाटीलवाडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. संदेश हे आपल्या बालेनो गाडीने मित्र हर्षद पाटील याला रुग्णालयात भेटण्यासाठी जात होते. त्याचवेळी समोरून मोटारसायकलवर येणाऱ्या सूरज पाटील आणि ओंकार पाटील यांनी त्यांची गाडी अडवली. ‘तू आमच्या मोटारसायकलला दाबण्याचा प्रयत्न का केलास?’ असे विचारत त्यांनी संदेश यांच्याशी वाद सुरू केला.
हा वाद वाढत गेल्याने आरोपींनी फोन करून इतरांना बोलावून घेतले. यावेळी रामदास पाटील, गुरुनाथ पाटील, संकेत पाटील, रवींद्र पाटील, सारिका पाटील, सूरज पाटील, ओंकार भार्गव पाटील, अनुज पाटील, सोहम पाटील, ओंकार गुरुनाथ पाटील आणि समीर मोरे यांच्यासह ११ जणांनी संदेश पाटील यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण करण्यात आली. तसेच, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. संदेश यांच्या मदतीला आलेल्या कुटुंबीयांनाही मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत.