मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ३ मार्च २०२५ रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी आणि इतर आश्वासने अद्याप पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने हे आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे.
राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून सुरू होत आहे.
या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. आंदोलनात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढता येईल, असे काँग्रेसने कळवले आहे.
तसेच, जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार आंदोलनाचे स्वरूप ठरवण्याची मुभा जिल्हाध्यक्षांना देण्यात आली आहे.
या आंदोलनात युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल, इंटक, आणि इतर विभागांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष यांनी केलं आहे.