सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची सेंद्रिय शेतीकडे रुची वाढत असतानाच बुधवार दि: १८/१०/२०२३ रोजी कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत येथे सेंद्रिय शेतीपर माहिती केंद्राचे आयोजन करण्यात आले होते.

सेंद्रिय शेतीचे भविष्य पाहता शेतकऱ्यांना विविध सेंद्रिय शेती पद्धती पोहोचाव्यात हे या माहिती केंद्राचे उद्दिष्ट्ये होते.

या माहिती केंद्रामध्ये जनावरांना कमी खर्चामध्ये पौष्टिक खाद्य म्हणून अझोला निर्मिती प्रकल्प तसेच गांडूळ खत निर्मिती, जीवामृत निर्मिती, दशपर्णी अर्क बनवण्याची प्रक्रिया या विषयावर व्याख्यान पार पडले.

या सोबतच जैविक खते, बीजामृत, पंचगव्य यासंदर्भातील माहितीही देण्यात आली.

या माहिती केंद्रामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभवविळा, कोनोवीडर, नारळ सोलणी यंत्र, नूतन झेला इ. गोष्टी प्रदर्शित केल्या होत्या.

यासोबतच संपूर्णा, आफ्रिकन टॉल, सिओ-३, पराग्रास या गवतांचे छायाचित्र प्रदर्शित केले गेले होते.

या सर्व कार्यक्रमामध्ये कोकण कण्याळ शेळी व कोकण कपिला गाई चे माहिती सत्र विशेष आकर्षणाचे ठरले.

विद्यापीठाच्या कृषी सह्याद्री गटाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास नीळेली पाशुपैदास केंद्र, उद्यानविद्या महाविद्यालय- मुळदे, माणगाव ग्रामपंचायत यांचे विशेष सहकार्य लाभले.

तसेच कृषी सह्याद्री गटाचे सुबोध नलवडे, प्रतीक चेडे, श्रीकांत शिंदे, संकेत देशमुख, अथर्व नलवडे, रोशन पाटील, शिवम घरबुडे, गौरव मिसळ आणि यश पवार यांनी कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित तंत्रज्ञानांची माहिती सांगितली.