खेडमध्ये गोळीबाराची खोटी तक्रार उघड, तक्रारदारावर गुन्हा दाखल

खेड: तालुक्यातील वेरळ फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर दोन व्यक्तींनी गोळीबार करून हल्ला केल्याची तक्रार शनिवारी सायंकाळी नोंदवण्यात आली.

खेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या या तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ही तक्रार खोटी असल्याचे उघड झाले.

तक्रारदाराने स्वतःच्या अपघाताचे सत्य लपवण्यासाठी गोळीबाराचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी संबंधित तक्रारदारावर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू ठेवला आहे.

पोलिसांच्या सखोल चौकशीत तक्रारदार आणि एका अनोळखी मोटारसायकल चालकामध्ये वाद झाल्याचे समोर आले. या वादानंतर बाचाबाची आणि शिवीगाळ झाली, त्यानंतर मोटारसायकलस्वाराने तक्रारदाराच्या गाडीवर दगड फेकून पळ काढला.

यानंतर तक्रारदाराने आपल्या भावाला गोळी लागल्याची खोटी माहिती दिली. विशेष म्हणजे, यापूर्वीही तक्रारदाराने अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार झाल्याची तक्रार नोंदवली होती, परंतु ती खोटी ठरल्याने ती निकाली काढण्यात आली होती.

या संपूर्ण प्रकरणात तक्रारदाराने डायल ११२ प्रणालीवर चुकीची माहिती दिल्याने खेड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*