आत्तापर्यंत जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या १० मध्ये असणारा फेसबुकचा प्रमुख मार्क झुकरबर्ग २०१५ नंतर पहिल्यांदाच पहिल्या दहामधून बाहेर पडला आहे. आणि याला कारणीभूत ठरली आहे फेसबुकच्या युजर्सची घटणारी संख्या! बुधवारी फेसबुककडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार फेसबुकच्या युजर्सच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गेल्या तिमाहीपेक्षा या तिमाहीमध्ये ही घट मोठी असून हा आकडा गेल्या १७ वर्षांतला सर्वाधिक आहे. त्याचा परिणाम थेट फेसबुकच्या शेअर्सवर झाला असून खुद्द मार्क झुकरबर्गच्या संपत्तीत तब्बल ३१ अब्ज डॉलर्सची घट झाली आहे.
दरम्यान, बुधवारी ही आकडेवारी जाहीर झाल. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच फेसबुकची पालक कंपनी असलेल्या मेटाचे शेअर्स घसरू लागले होते. पहिल्या तासाभरातच फेसबुकच्या शेअर्सच्या किंमती २० ते २२ टक्क्यांनी घटल्या होत्या. त्यापाठोपाठ संध्याकाळपर्यंत हे शेअर्स मोठ्या प्रमाणावर खाली आले. याचा फटका मार्क झुकरबर्गसोबतच मेटाच्या इतर प्रमुख सदस्यांना देखील बसला आहे.