नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : नैसर्गिक संकटात हानी होऊच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वेंगुर्ले येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी किनारपट्टीवरील जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कोविडकाळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळित राखणे, ऑक्सिजन टँकची सुरक्षितता तपासणे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवून पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी. या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले, तेव्हा राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते. गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. अतिवृष्टी आणि वादळाला राज्य सामोरे गेले. या नैसर्गिक संकटात प्राणहानी होऊच नये आणि मालमत्तेची ही हानी टाळता यावी यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे झाले आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांत हजारो लोकांना कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ही सगळी परिस्थिती सिंधुदुर्गसह किनारपट्टी जिल्ह्यांनी यशस्वीरीत्या हाताळली आणि या आव्हानांचा कुशलतेने सामाना केला. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे, तसाच तो यंत्रांवरही आहे, ही यंत्रे ही चोवीस तास सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या, त्या टाळण्यासाठी विद्युत वायरिंग तपासून घेणे, रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. ती वीज तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे म्हणजे, मास्क व्यवस्थित लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात धुणे या त्रिसूत्रीचे, कटाक्षाने पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*