मलिकांची ५ तासांपासून ईडीकडून चौकशी, ई़डीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात आणले असून त्यांची मागील ५ तासांपासून चौकशी सुरू आहे. दाऊद इब्राहीम मनी लाँड्रींग प्रकरणी मलिकांची ईडीकडून चौकशी केली जात आहे. यावर राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या असून ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून जोरदार आंदोलन केलं जात आहे. नवाब मलिकांच्या समर्थनार्थ केंद्र सरकारविरोधात युवक आणि कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात आहे.

ईडी कार्यालयाच्या बाहेर आणि अगदी हाकेच्या अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे. ई़डी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच त्यांच्या हातात पोस्टर्स आणि काही बॅनर्स देखील आहेत. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

नवाब मलिक चांगल्या प्रकारची कामं करत असताना हे लोकं त्यांना का त्रास देतात, अशा प्रकारचा सवाल कार्यकर्त्यांकडून विरोधकांना विचारला जात आहे. कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय की, भाजप पक्षातील नेते लोकांचा रोजगार काढून घेत आहेत. तसेच त्यांनी लोकांना कामं सोडायला लावली आहेत. गोरगरीब जनतेला प्रचंड त्रास दिलाय. मात्र, नवाब मलिक चांगल्या प्रकारची कामं करत असून त्यांना खोट्या आरोपांमध्ये अडकवल्याचा प्रयत्न केला जातोय, अशा प्रकारची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी दिली आहे.

ईडीने सुडबुद्धीचा डाव टाकत मलिकांना पहाटेच त्यांच्या घरातून चौकशीसाठी आणलं आहे. त्यामुळे त्याचा आम्ही निषेध करत आहोत. अशा प्रकारे जर केंद्र सरकार त्यांच्या आकासापोटी सुडबुद्धीने कार्यवाही करत असतील, तर त्याचा आम्ही निश्चितपणाने निषेध करू आणि येणाऱ्या समस्यांना केंद्र सरकार जबाबदार राहील, अशा प्रकारचं वक्तव्य करत केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त केला जात आहे. जोपर्यंत आमच्या नेत्यांना तुम्ही बाहेर सोडणार नाही. तोपर्यंत आम्ही इथेच ठाण मांडून बसू, असं देखील युवक कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*