करोनानंतर अर्थव्यवस्था सावरत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली -करोनानंतर नवी जागतिक व्यवस्था तयार होईल. आज भारताकडे पाहण्याच्या जगाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. आपणही देशाला अधिक वेगाने पुढे नेणे आवश्‍यक आहे. अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्‍यक त्या तरतुदी करण्यात आल्या असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 2022 च्या अर्थसंकल्पावर भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी यावेळी पंतप्रधान मोदींनी सांगितल्या. देश 100 वर्षांतील सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. करोनाच्या या काळात जगासमोर अनेक आव्हाने आली आहेत. आपण पुढे जे जग पाहणार आहोत ते करोनापूर्वीचे जग राहणार नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी कार्यकर्त्यांना सांगितले की, नवीन संकल्प पूर्ण करण्याची हीच वेळ आहे. आत्मनिर्भर भारताच्या पायावर आधुनिक भारताची उभारणी झाली पाहिजे. 2013-14 मध्ये भारताची निर्यात 2 लाख 85 हजार कोटी रुपयांची होती. आज भारताची निर्यात 4 लाख 70 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

आता जवळपास नऊ कोटी ग्रामीण घरांमध्ये नळांचे पाणी पोहोचू लागले आहे. गेल्या सात वर्षांत आपल्या सरकारने तीन कोटी गरिबांना पक्‍की घरे देऊन लखपती बनवले आहे. जे गरीब होते ते झोपडपट्टीत राहत होते, आता त्यांच्याकडे स्वतःचे घर आहे. या घरांसाठीची रक्‍कमही पूर्वीच्या तुलनेत वाढली असून मुलांना अभ्यासासाठी जागा मिळावी म्हणून घरांचा आकारही वाढला आहे.

मोठी गोष्ट म्हणजे यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींपूर्वी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यक्रमाला संबोधित केले. आम्हाला पंतप्रधानांकडून वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आले आहे. येत्या 25 वर्षांत नव्या भारताचा पाया रचण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेले अमृत काल, देशाला विकासाच्या नव्या उंचीवर नेईल, असे नड्डा म्हणाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*