दापोली : हरितक्रांतीचे प्रणेते आणि भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने ७ ऑगस्ट हा दिवस शाश्वत शेती दिन म्हणून साजरा करण्यात आला.

या औचित्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात स्वामीनाथन सभागृहात शाश्वत शेती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात त्यांनी तरुण विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांनी डॉ. स्वामीनाथन यांचा आदर्श घेतल्यास शाश्वत शेतीद्वारे समृद्धी साधणे सहज शक्य असल्याचे सांगितले.

डॉ. भावे म्हणाले, “७० ते ८० च्या दशकात देशाला लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नधान्य आयात करावे लागत होते. मात्र, डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाने कृषि क्षेत्रात क्रांती घडली आणि आज भारत जगाला अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून ओळखला जातो. त्यांनी शाश्वत शेतीचा पाया रचून ठेवला आहे.”

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे, वनशार महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अजय राणे, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अतुल मोहोड, कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. स्वामीनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन, राज्यगीत, विद्यापीठ गीत आणि स्वामीनाथन गीताने झाली.

प्रास्ताविक निम्नस्तर कृषी शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संतोष परवडेकर यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मंदार पुरी यांनी केले.

या वेळी शाश्वत शेतीच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन करण्यात आले. रिकेश गोसाई (पीएचडी स्कॉलर) यांनी ‘शाश्वत शेतीमध्ये कृषी अभियांत्रिकीचे योगदान’, प्रदयुम्न देशमुख (पीएचडी स्कॉलर) यांनी ‘शाश्वत शेतीमधील कृषी वनिकीचे महत्व’, डॉ. वैभव राजेमहाडीक यांनी ‘शाश्वत शेतीसाठी काव्यची गरज’, डॉ. पूनम चव्हाण यांनी ‘शाश्वत काटेकोर शेती’ आणि डॉ. प्रफुल्ल माळी यांनी ‘शाश्वत शेती फळबाग व्यवस्थापन’ या विषयांवर व्याख्याने दिली.

कार्यक्रमाला विद्यापीठातील विविध विभागप्रमुख, प्राध्यापक आणि पदव्युत्तर कृषि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.