
दापोली – ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल (जे.सी.आय.) दापोलीच्या नवीन अध्यक्षपदी डॉ. कुणाल मेहता यांची निवड करण्यात आली आहे.
माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी बुधवारी सायंकाळी अधिकृतपणे त्यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपवली. हा पदग्रहण सोहळा ७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता दापोली येथील पितांबरी रिसॉर्टमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात बोलताना माजी अध्यक्ष फराज रखांगे यांनी गेल्या वर्षभरातील जे.सी.आय. दापोलीच्या कार्याचा आढावा घेतला. जे.सी.आय. ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संघटना असून, समाजोपयोगी उपक्रमांवर विशेष भर दिला जातो, असे त्यांनी नमूद केले.
गेल्या वर्षात दापोलीत ५० हून अधिक उपक्रम राबविण्यात आले. यात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, मॅरेथॉन, वैद्यकीय तपासणी शिबिरे, पिण्याच्या पाण्याचे फिल्टर बसविणे, वृक्षारोपण आणि समुद्रकिनारी शॉवर सुविधा उभारणे यांसारख्या विविध योजना होत्या.
या सोहळ्याला गोवा व मुंबई येथून जे.सी.आय.चे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी सदस्यांना सामाजिक कार्यात सातत्य ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
नूतन अध्यक्ष डॉ. कुणाल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या वडिलांच्या समाजकार्य परंपरेचा वारसा पुढे नेहण्याचा निर्धार व्यक्त केला. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्याने आरोग्यविषयक गरजूंना मदत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, समाजातील सर्व घटकांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी जे.सी.आय.च्या माध्यमातून विविध उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी दापोलीच्या नगराध्यक्षा कृपा घाग, नगरसेविका प्रीती शिर्के, डॉक्टर मेहता, जे.सी.आय. दापोलीचे सदस्य, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला अतुल गोंदकर, तेजस मेहता, ऋषिकेश तलाठी, मयुरेश शेठ, निकेत मेहता, स्वप्निल मेहता, रोशन वेदक, ऋषिकेश शेठ, समीर कदम, कुणाल मंडलिक, अरुण गांधी यांच्यासह जे.सी.आय. दापोली, दशनेमा गुजर युवक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply