रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात उद्या 01 जुन पासून माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
सोबतच गृहविलगीकरण बंद करुन ग्राम कृती दलांच्या मदतीने 200 गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज ही माहिती दिली.
याबाबत तालुकास्तरीय महसूल तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक आज पार पडली. या बैठकीस पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपण आता एका निर्णायक टप्प्यावर असून यावेळी मोठया प्रमाणावर कृती द्वारे आपण दूसऱ्या लाटेवर पूर्णपणे नियंत्रण मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉन्टॅक्ट ट्रेसींग
दिवसाला साधारण 500 रुग्ण आज जिल्हयात आढळू येत आहे. या प्रत्येक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील किमान 20 जणांच्या चाचण्या होणे आवश्यक आहे असे उद्दीष्ट ठरवून तालुक्यांच्या ठिकाणी मोबाईल तपासणी पथके कार्यान्वीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 2000 पेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावात शाळा, मंगल कार्यालये अशा जागांवर संस्थात्मक विलगीकरण व्यवस्था करणे तसेच तपासणी झालेल्या व्यक्तीला तपासणीचा रिझल्ट प्राप्त होईपर्यंत इतरांमध्ये मिसळू न देणे आदि बाबी केल्या जातील यासाठी काही कमी लोकसंख्येच्या गावांनी पुढाकार घेतला तरी त्यांना संमती द्यावी असे जिल्हाधिकारी म्हणाले. जिल्हयात सर्वत्र ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींसाठी रत्नागिरी शहराप्रमाणे मोबाईल लसीकरण सुरु करण्याच्या सूचना देखील या बैठकीत देण्यात आल्या. नोकरी निमित्ताने अथवा शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन खात्री पटल्यावर पात्र व्यक्तींचे लसीकरण विना अपॉईन्टमेंट करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या.
सिमा बंदी
वैध कारणाखेरीज जिल्हा प्रवेश बंदी करणारे आदेश २ ते ८ जुन २०२१ दरम्यान लागू राहणार आहेत. या काळात सर्व जिल्हा सिमा मार्गावर तपासणी नाके लावण्याचे निर्देशही या बैठकीत देण्यात आले.