खेड – शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी आयोजित पक्षाच्या बैठकीत उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख यांच्यासह त्यांच्या समर्थकांची हकालपट्टी केली आहे.

बैठकीत,’आपण कोणकोणते प्रताप केलेतं ते लोकांना सांगा, त्यानंतर भास्कर जाधव यांनी मदत केली नाही, हे बिनबुडाचे आरोप करताय, ‘तुम्ही नको ते उपद्व्याप करायचे आणि गळ्याशी आल्यावर दुसऱ्यावर ढकलायचे, हा कुठला प्रकार?’, असा प्रश्नही शिवसेना उबाठा गटाच्या बैठकीत संतप्त शिवसैनिकांनी उपस्थित केला होता.

शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव यांनी मोजक्या शिवसैनिकांना बैठकीला बोलावले होते. मात्र उपजिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांच्या संदर्भातील चर्चा असल्याने हजारो शिवसैनिक तेथे हजर झाले होते.

बैठकीत राजेंद्र आंब्रे, चंद्रकांत चाळके यांच्याबद्दल संतप्त भावना मांडल्या गेल्या. काही जेष्ठ शिवसैनिकांनी, ‘हे गेले ते बरं झालं, आमच्या शिवसेनेचं नाव त्यांनी खराब केलं होतं, पक्षाला डाग लागलं होतं, अशा भावनाही यावेळी उमटल्या होत्या.

या दोघांच्या हकालपट्टी नंतर त्यांच्या जागी नवीन नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी केली. दोघांच्या हकालपट्टीचा ठराव केल्यानंतर नवीन नेमणूक करण्यासाठी थेट उध्दव ठाकरे यांना आमदार जाधव यांनी फोन केला.

त्यांच्या सूचनेनुसार उपजिल्हा प्रमुख पदी सचिन उर्फ पप्पू आंब्रे आणि तालुका प्रमुख पदावर अंकुश काते यांची नेमणूक जाहीर केली.

या बैठकीला महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख अरुणा आंब्रे, माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव, विष्णू आंब्रे, विजय साळूंके, महेश गोवळकर, देवेंद्र मोरे, आप्पा पालांडे, कृष्णा लांबे, अन्वर खान, बशीर हमदुले, राजेंद्र घाग, संतोष उत्तेकर, विजय राक्षे, जयवंत पालांडे, आशिष धाडवे, संदीप कदम, रमेश उत्तेकर, रोहित चाळके आदींसह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

चौकशा कुणी लावल्या? – चंद्रकांत चाळके, राजेंद्र आंब्रे आणि त्याचे सहकारी ही मंडळी केवळ तीन वर्षांपासून भास्कर जाधव यांच्या सोबत आहेत. त्यापूर्वी ते माजी मंत्र्यांसोबत होते. त्यांच्या सोबत असतानाच या लोकांनी चुकीची कामे केली होती. यानंतर या चूकीच्या कामाची चौकशी कुणी लावली? तो सगळा पूर्व इतिहास आठवा.

पोलिस चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागल्यावर तो कुणी लावला? हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया झाली, याचा जाब त्या नेत्याला जाऊन विचारायला हवाय, अशा संतप्त प्रतिक्रिया बैठकीत उमटल्या.