रत्नागिरी : कामाबद्दलची एकनिष्ठता, राजशिष्टाचार, प्रामाणिकपणा या गोष्टींचा आदर्श आजच्या पिढीने घेणे गरजेचे आहे असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले.

आजच्या कर्मचाऱ्यांनी शशिकांत केळकर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असे आज जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक शशिकांत लक्ष्मण केळकर यांच्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जि.प.समाजकल्याण सभापती परशुराम कदम, जेष्ठ पत्रकार अरविंद कोकजे, राजेंद्रपसाद तसेच पत्रकार राजेंद्र चव्हाण, मुश्ताक खान, राजेश चव्हाण, विजय पाडावे, राजेश कळंबटे, मेहरुन नाकाडे, चंद्रकांत बनकर, निलेश जगताप आदी पत्रकार उपस्थित होते. त्यासोबतच श्री. केळकर यांच्या आई भागिथी केळकर, पत्नी शितल केळकर, मुलगी साधना, पल्लवी, मुलगा चिन्मय, जावई सात्विक साधले व इतर कुटूंबिय उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. मुळे म्हणाले, आपल्या ३४ वर्षाच्या कार्यकाळात श्री. केळकर यांनी आपले कर्तव्य कधीही टाळले नाही. त्यांच्यावर कार्यालयाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पार पाडली. वाहचालक हा अधिकाऱ्यांच्या कायम सोबत असतो. त्यामुळे एक वेगळा जिव्हाळा निर्माण होतो. केळकर यांच्यासोबत काम करताना त्यांच्या मधील प्रामाणिकपणा कायम जाणवत राहिला, असे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. केळकर यांनी आपल्या नोकरीच्या कालावधीतील अनुभव कथन केले. तसेच आपल्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर, मुश्ताक खान यांनी आपले मनोगत व्यक्त केली.

यावेळी श्री. केळकर यांची कन्या साधना हिने आपल्या वडीलांना स्वत: बनविलेला वाहनाची प्रतिकृती असलेला आर्ट क्ले भेट दिला. तसेच त्यांचे जावई सात्विक आणि साधना यांनी आपल्या वडीलांबद्दल भावना व्यक्त करणारी कविता सादर केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अनघा निकम यांनी केले.